हजरजबाबी

यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात शरद पवार हेच लोकनेते होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात स्थिरावायचं असेल तर पवार यांच्यावर आरोप करण्यावाचून पर्याय नाही, हे विरोधकांना समजून चुकले होते. त्यामुळे विरोधक बेलाशक काहीही आरोप करत. पवारसाहेब मात्र या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडत नसत. पण तरीही पवार जेव्हा उत्तर देत तेव्हा विरोधक चारीमुंड्या चित होतात. 

शिवसेना-भाजप युती सरकार होते. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील एक मंत्री होते. मंत्री झाल्यावर त्यांनी काही लाख रुपये करून नवे घर बांधले होते. त्यांनी शरद पवार हे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांच्यावर बेलगाम आरोप केले. शरद पवार भाषणाला उभे राहिले म्हणाले, या आरोपांना उत्तर द्या असा कार्यकर्ते आग्रह करत आहेत. मात्र, आरोप करणाऱ्या या महान नेत्याला मी काही ओळखत नाही. या नावाचा एक नेता घरातून डबा घेऊन सायकलवरून प्रचार करत फिरत असे. एवढे म्हणताच सभेत टाळ्या आणि हशाचा एकच गजर झाला.

शरद पवार पुलोदमध्ये मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसमधील आमदारांचा एक गट आला होता. सरकार बरखास्त केल्यानंतर बरेच आमदार स्वगृही गेले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एका महान नेत्याचा समावेश होता. त्यांनी आदल्या दिवशी सभेत सांगितले होते, पंढरपूर ज्या जिल्ह्यात आहे. त्या जिल्ह्यातील मी आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे आणि विटेचे जसे नाते आहे. तसे माझे आणि शरद पवार यांचे नाते आहे. त्यांच्या पायाखालची मी विट आहे. या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी हा नेता पवार यांची साथ सोडून कॉंग्रेसमध्ये गेला. ही बातमी शरद पवार यांना समजताच ते म्हणाले हा विठ्ठल विटेसकट गेला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे खरे तर जीवाभावाचे मित्र. मात्र या दोन्ही नेत्यांत शाब्दिक युद्ध रंगायचे. शिवसेनाप्रमुख तर टीका करताना हातचे काहीच राखत नसत. एका सभेत त्यांनी पवारांवर अश्‍लाघ्य शब्दात टीका केली. हाडे मोडू वगैरे शब्दप्रयोग वापरले. शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर दिले. मी ग्रामीण भागातील आहे. तुम्हाला दोनच शिव्या येतात. मला खूप येतात पण त्या देणं ही आमची संस्कृती नाही. आणि हात वर केल्यावर ज्यांच्या बरगड्या मोजता येतात त्यांनी हाडे मोडायची भाषा करू नये.

लातूरमध्ये झालेल्या भूकंपात खरे तर शरद पवार यांनी झंजावाती काम केले. उद्‌ध्वस्त झालेली गावे उभी केली. माणसं उभी केली. पण पवार यांच्यावर आरोप करण्यावरच ज्यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून होते. त्यांनी पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. पवार यांना पत्रकारांनी त्याबाबत विचारले असता मस्त उत्तर दिले, पवार म्हणाले, आता लातूरचा भूकंप मीच घडवला, एवढा एकच आरोप करायचा बाकी आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पवार यांच्यावर आरोप करत असत. त्यांनी काही राजकीय नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला होता. त्यातील एक होते आर. आर. पाटील. एकदा पत्रकारांनी हजारे यांच्या आरोपाबाबत पवार यांना प्रश्‍न विचारला, पवार म्हणाले, आमचे सर्व नेते विधानसभेत 70 हजार ते एक लाखाच्या मताधिक्‍याने विजयी झाले. फक्त आर. आर. पाटील हे चार हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. तेव्हा हजारे यांचा जनतेवर असणारा प्रभाव तुम्हीच ठरवा. त्यानंतर हजारे यांचा जनमानसावर असणारे गारूड कमी होण्यास सुरुवात झाली, हे वेगळे सांगायला नकोच.

विठ्ठलनामा हे विठ्ठलशेठ मणीयार यांचे पुस्तक. ते पवार यांचे मित्र. त्याचा प्रकाशन समारंभ शरद पवार यांच्या हस्ते होता. तर प्रमुख पाहुणे होते सामनाफचे संपादक संजय राऊत. राऊत यांनी पवार यांचा उल्लेख देशाचे नेते असा केला. त्यानंतर पवार म्हणाले, सामनाचे संपादक येथे आहेत तेव्हा आपण जावे की जाऊ नये या विचारात होतो. कारण ते भावंडात भांडणेही लावतात आणि त्यांना एकत्रही आणतात. राज ठाकरे यांचे बंड आणि त्यानंतर काही काळ ते परत आले होते. या पार्श्‍वभूमीवर केलेल्या या विधानाने सभागृहात एकच हशा उसळला.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक सभेत आमचे पैलवान लढायला तयार आहेत. त्यांचे बाहू फुरफुरत आहेत. ते आव्हान देत आहेत. पण पलिकडे कोणी पैलवानच नाही, असे सांगत होते. सोलापूरच्या सभेत शरद पवार म्हणाले, कुस्ती पैलवानासोबत खेळायची असते. असल्यांसोबत नाही, असे म्हणून त्यांनी हात खाली केला. पुढील सभेपासून फडणवीसांकडून पैलवानकीची भाषा बंद झाली.

कोणत्याही नेत्याची कुंडली पवार यांना पाठ असते. तरीही ते कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. त्याऐवजी विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष देण्याचा त्यांचा स्वभाव त्यांचे वेगळेपण, मोठेपण अधोरेखित करतो.

– मिथिलेश जोशी 

Leave a Comment