करोनाबाधित आफ्रिदीमुळे शेकडो लोकांची उडाली झोप

कराची – पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या शेकडो लोकांची झोप उडाली आहे.

आफ्रिदीसह करोनाग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या शेकडो सहकारी व्यक्तींमध्येही घबराट पसरली असून यातील काही व्यक्तींनी करोनाची चाचणीदेखील करुन घेतली आहे. पाकिस्तानमध्येही करोनाचा धोका वाढत गेल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात आफ्रिदीने स्वतःच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना मदतीचा हात दिला. इतकेच नाही तर त्याने पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंसाठीही भरघोस मदत केली. त्याच्या या कार्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झाले. मदतीचे वाटप करताना मात्र, आफ्रिदीसह त्याच्या कार्याला मदत करणारे अनेक लोक मास्कही वापरत नव्हते, त्यामुळे आता आफ्रिदीला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने त्यांच्यात घबराट पसरली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून आफ्रिदी व त्याचे सहकारी पाकिस्तानातील अनेक शहरांत तसेच छोट्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सर्व सामान्यांना अन्नधान्य, औषधे व जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करत आहेत. या कार्याबाबत आफ्रिदीवर कौतुकाचा वर्षावही होत होता. मात्र, यातील काही व्हिडीओ व फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्याच्या बेजबाबदारपणावर टिकाही केली होती. वस्तूंच्या वाटपादरम्यान त्याने तसेच त्याच्या सहकारी लोकांनी मास्क वापरण्याचे शहाणपणही दाखवले नाही. तसेच हातात ग्लोल्व्हज देखील घातलेले दिसून आले नाही.

Leave a Comment