satara | शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन

महाबळेश्वर (छ. शिवाजी महाराज नाट्यनगरी),  (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्या, दि. 24 रोजी दुपारी 12.30 वाजता महाबळेश्वर येथे ‘छ. शिवाजी महाराज नाट्यनगरी’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आ. मकरंद पाटील, नाट्य परिषदेचे विश्वस्त, संमेलनाचे मुख्य निमंत्रक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त महाबळेश्वर पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महाबळेश्वर महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटनदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. महाबळेश्वर महोत्सवात सर बोमनजी दिनशा पेटिट लायब्ररीत ऐतिहासिक शास्त्र व वाहन (व्हिंटेज कार) प्रदर्शन भरणार आहे.

सेठ गंगाधर माखरिया गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शनाचे होणार आहे. सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या प्रांगणात खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पालिकेच्यावतीने संमेलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यानिमित्ताने होणार्‍या कार्यक्रमांसाठी स्थानिक नाट्यकर्मी रंगीत तालमी ककरत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण शहर सुशोभित करण्यात आले असून, संमेलनासाठी येणार्‍या नाट्यकर्मींच्या स्वागतासाठी महाबळेश्वरकर सज्ज झाले आहेत.

या संमेलनामुळे महाबळेश्वरमधील नाट्य चळवळीस गती मिळणार आहे. पोलीस परेड मैदानावर होणार्‍या या सोहळ्यात उद्या (शनिवार), दि. 24 सकाळी 10 वाजता भव्य नाट्यदिंडी काढण्यात येणा असून, सिने व नाट्य कलाकार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ या दिंडीचे आकर्षण असतील. या दिंडीत विविध राज्यांमधील पारंपरिक वेशभूषा करून, स्थानिक महिला त्या राज्यांची पारंपरिक नृत्ये सादर करणार आहेत.

महाबळेश्वर तालुका वारकरी संघटनेचे सदस्य पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. या दिंडीची सुरुवात वेण्णा दर्शन येथून होणार असून, बाजारपेठमार्गे पोलीस परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज नाट्यनगरीत दिंडीचा समारोप होईल. त्यानंतर नाट्य संमेलनाचे उद्घाटन आणि उद्घाटन सोहळ्यानंतर हास्यसम्राट प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी 5.30 वाजता ‘कुर्रर्रर्रर्रर्रर’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होणार आहे. प्रसिद्ध नाट्यकर्मी पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी, विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव आदींच्या भूमिका या नाटकात आहेत. रात्री आठ वाजता नाट्य व सिनेकलावंतांची ‘संगीत रजनी’ होणार आहे. रविवार, दि. 25 रोजीदेखील भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली.

त्यामध्ये सकाळी 10.30 वाजता स्थानिक महिला व नाट्यकमर्मींंचा सांस्कृतिक कार्यक्रम, 11 ते 4 तीन बालनाट्ये होणार आहेत. यात सर्वप्रथम महाबळेश्वर गिरीस्थान शिक्षण मंडळाचे विद्यार्थी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ हे बालनाट्य सादर करणार आहेत. दुपारी 12 ते 2 ‘फुग्यातला राक्षस व टेड्डी’ आणि ‘डोरेमॉन’ ही दोन व्यावसायिक बालनाट्ये होणार आहेत.

दुपारी 3 ते 4 ‘नाटक माझ्या चष्म्यातून’ हा परिसंवाद होणार असून, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ भावेश भाटिया, पोलीस अधीक्षक समीर शेख सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते हृषीकेश जोशी सूत्रसंचालन करणार आहेत. दुपारी 4 वाजता नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा होणार असून, डॉ. जब्बार पटेल, सौ. नीलम शिर्के-सामंत, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 ते 7.30 ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे.

‘अवधूत गुप्ते नाईट’ संमेलनाचे आकर्षण
संमेलनाचा समारोप रविवार, दि. 25 रोजी सायंकाळी ‘अवधूत गुप्ते नाईट’ या कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये 150 कलाकार व तंत्रज्ञ सहभागी होणार आहे.