‘खर्गेंचे नाव पुढे आल्याने मी नाराज नाही, मी स्वतः कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही…’ – नितीशकुमार

Nitish Kumar – इंडिया आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदासाठी (Prime Minister) कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे नाव पुढे केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात होते.

पण या विषयावर आज स्वत: नितीशकुमार यांनीच खुलासा केला असून त्यांनी म्हटले आहे की “मी नाराज किंवा निराश होण्याचा प्रश्‍नच नाही. मी स्वत: कोणत्याही पदासाठी इच्छुक नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेतेपदासाठी कॉंग्रेस अध्यक्षांचे नाव पुढे केले गेले असेल तर त्याला माझा काही आक्षेप असण्याचे कारणच नाही.

मुळात मीच भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणले आहे. त्यामुळे नेतेपदावरून या आघाडीत फूट पडावी अशी माझी इच्छा नाही इतक्या स्वच्छ शब्दात त्यांनी या संबंधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.आज अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्याच्या एका कार्यक्रमात नितीशकुमार आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा मुद्दा स्पष्ट केला.

दऱम्यान ममता, केजरीवाल आणि आता नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीच्या नेतेपदाविषयी आपआपली भूमिका स्पष्ट केल्याने आता इंडिया आघाडीचे नेतृत्व कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्‍चीत झाले आहे. त्यामुळे या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा कळीचा मुद्दा आता राहिलेला नाही असेही मानले जात आहे. दरम्यान इंडिया आघाडीचे जागा वाटप त्वरीत व्हावे अशी आपली आग्रहाची सूचना इंडिया आघाडीकडे केली आहे असेही नितीश यांनी यावेळी स्पष्ट केले.