‘हुकुमशाहीच्या विरोधातील कारावासाचा मला अभिमान…’; अरविंद केजरीवाल २ जूनला पुन्हा तुरूंगात जाणार

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, कोर्टाच्या निर्णयानुसार ते २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. आपले मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुरुंगात त्रास झाला तरी मी झुकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जून पर्यंत प्रचारासाठी अंतरीम जामीन मंजुर केला होता. त्याची मुदत उद्या संपत आहे.

या संबंधात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मला २ जूनला आत्मसमर्पण करावे लागणार आहे आणि यावेळी मी किती काळ तुरुंगात राहीन हे मला माहीत नाही. या देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहे आणि याचा मला अभिमान आहे,असे त्यांनी आज एका पत्रकार परिषदेत नमूद केले.

त्यांनी मला तोडण्याचा प्रयत्न केला, मी तुरुंगात असताना माझी औषधे बंद केली. अटक झाल्यानंतर माझे वजन सहा किलोने कमी झाले. मला अटक झाली तेव्हा माझे वजन ७० किलो होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझे वजन वाढले नाही, असे केजरीवाल म्हणाले. डॉक्टरांनी अनेक चाचण्यांचा सल्ला दिला आहे आणि डॉक्टरांना वाटते की आरोग्याच्या दृष्टीने या चाचण्या महत्वाच्या आहेत असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यासाठी रविवारी दुपारी 3 च्या सुमारास त्यांचे निवासस्थान सोडतील. ते मला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण मी झुकणार नाही. तुरुंगात गेल्यावर मला तुमची (लोकांची) काळजी वाटेल.

तुमच्या सेवा बंद होणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. मी लवकरच रु. माझ्या माता आणि भगिनींना आमच्या सरकारतर्फे दरमहा एक हजार रुपये मासिक मानधन सुरू करणार आहे असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांनी लोकांना आपल्या आजारी असलेल्या आईसाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.