भाजप अध्यक्ष सांगतील तसे करीन; राजीनाम्याच्या चर्चेवर येडियुरप्पांच विधान

बंगलुरू – भाजपकडून मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. येत्या 26 जुलैला आमच्या सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नढ्ढा मला जे सांगतील ते मी करीन अशा शब्दात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याच्या विषयावर भाष्य केले आहे.

आज संध्याकाळपर्यंत मला निरोप येईल, तो आल्यावर मी त्वरेने तुम्हाला त्याची माहिती देईन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेले काही दिवस येडियुरप्पांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स कायम आहे. आपल्याला राजीनामा द्यायला सांगितलेले नाही असे येडियुरप्पा यांनी सातत्याने सांगितले असले तरी त्यांची गच्छंती आता अटळ आहे आणि त्याची कल्पना येडियुरप्पांनाही आली आहे असे कर्नाटकातील सध्याचे चित्र आहे.

78 वर्षीय येडियुरप्पांना मध्यंतरी दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचे भवितव्य निश्‍चीत झाले आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान आज सकाळी येडियुरप्पा हे बेळगावला पुर स्थितीची पहाणी करण्यासाठी रवाना झाले.