मैं झुकेगा नहीं.! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं ‘पुष्पा स्टाइल’ सेलिब्रेशन

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच पंढरपुरमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे.

पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केला आहे. यात अमरजित पवार यांनी राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय केस-दाढी न करण्याचा निर्धार केला होता.

अमरजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांपासून दाढी केली नव्हती. आज आजोती ग्रामपंचायतीत पवार यांच्या पत्नीचा विजय होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला आहे. तर अमरजित पवार यांनी अगदी ‘पुष्पा स्टाईल’ सेलिब्रेशन करत नवस पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.