पुणे | शिवाजी महाराजांच्या विचारांवरच आदर्श लोकशाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – २१व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडल हे आदर्श आहे. यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी. राष्ट्र, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला, संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञाननिष्ठ परंतु, श्रद्धावान संस्कारित समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे अध्यक्ष आणि भारतीय इतिहास संशोधक समितीचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे उद्घाटन हडपसर येथील साधना विद्यालयात झाले.

या प्रसंगी धर्मादाय सह आयुक्त सु. मु. बुक्के हे उद्‌घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच स्वागताध्यक्ष डॉ. सुहास पायगुडे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे, रवींद्र बेडकिहाळ, शिक्षणतज्ज्ञ अनुराधा निकम आणि जागतिक कीर्तीचे समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर, कर्नल सचिन रंदाळे, मुख्याध्यापक डी. जी. जाधव, अ‍ॅड. नंदिनी शहासने, देशभक्त कोषाकार चंद्रकांत शहासने आणि मंजिरी शहासने उपस्थित होत्या.

या प्रसंगी चंद्रपूर येथील पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना कै. शांताराम भाऊशेट शहासने जीवनगौरव पुरस्काराने प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रात सहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रूपयांची भरीव योजना आखली आहे. सिंदखेड राजा येथे माता जिजाऊचे स्मारक, रामटेक आणि मुंबई बरोबरच अन्य ठिकाणी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी प्रसिद्ध वास्तू रचनाकार ओजस हिराणी हे एक रूपयांच्या मानधनावर कार्य करणार आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले. डॉ. पायगुडे यांनी प्रास्ताविक केले, शहासने यांनी आभार मानले.