“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारावी”, महेश कोठारेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. अभिनय असो वा दिग्दर्शनातील नवीन नवीन प्रयोग महेश कोठारे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येतात. नुकतंच महेश कोठारेंच्या आयुष्यातील चढ उतार सांगणार ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कोठारे यांनी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या.

मराठी सिनेसृष्टीतील तो एक काळ होता जेव्हा महेश कोठारे,लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी सिनेमा वाढवला आणि मोठा केला. महेश कोठारे यांच्या पहिल्या सिनेमापासून ते मालिका विश्वातील अनेक घडामोडी त्यांच्या या पुस्तकातून उलगडण्यात आल्या आहेत. याच निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीत कोठारे यांना तुमच्यावर बायोपिक आला तर कोणत्या अभिनेत्याने त्यामध्ये काम करावं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोठारे यांनी देखील त्यांच्या जवळच्या एका अभिनेत्याने नाव सांगून टाकले.

“माझ्यावर बायोपिक आला तर आदिनाथ कोठारे माझी भूमिका साकारून शकतो” असे स्पष्ट मत यावेळी महेश कोठारे यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशनादरम्यान महेश कोठारे म्हणाले,हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे. यात माझ्या संपूर्ण आयुष्याची जर्नी आहे. कोणत्याही क्षेत्रातील तरुण तरुणीला यश मिळवायचं असेलत तर हे पुस्तक नक्की प्रेरणा देईल” असंही कोठारे यावेळी म्हणाले.