उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा रंगभूमीवर; शेअर केला व्हिडिओ

मुंबई – अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र बराच काळ या दोघांनी एकत्र काम केलेले नाही. आता त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच हे दोघे नव्या नाटकाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

इरावती कर्णिक लिखित ‘जर तरची गोष्ट’या नाटकाच्या माध्यमातून हे दोघे एकत्र रंगभूमीवर एकत्र येणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी चाहत्यांना नव्या नाटकाविषयी माहिती दिली. या प्रिया म्हणाली, “प्रेक्षकांनी ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाला खूप प्रतिसाद दिला. यानंतर २०१४ पासून मी नाटकात काम केलेलं नाही. आता नाटकात काम केल्यास जवळच्या व्यक्तींबरोबर करायचे हे मनात ठरवलं होतं. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. आम्ही तालमीला सुरुवात केली असून ५ ऑगस्टला गडकरी रंगायतनला प्रयोग होईल, तर पुढचा प्रयोग पुण्यात १२ ऑगस्टला होईल. तुम्ही सर्वजण नक्की या!” असे आवाहनही प्रियाने केले आहे.

उमेश कामत इन्स्टाग्रामवर या नाटकाचा प्रोमो शेअर केला आहे. “प्रियाबरोबर मी खूप वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. जर आपण पुन्हा एकदा एकत्र नाटक केलं तर? या ‘जर तर’ पासून सुरू झालेला प्रवास ‘जर तरची गोष्ट’पर्यंत येऊन पोहोचला यहए. ‘जर आणि तर’ मध्ये अडकलेल्या नात्याची, हसण्याची आणि रुसण्याची ही आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे,” असे उमेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

दरम्यान,  या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामतसह आशुतोष गोखले, पल्लवी अजय हे कलाकारही असणार आहेत.