पुणे | मुळशी धरणाची उंची वाढविल्यास दीड ते दोन टीएमसी पाणी साठणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास धरणात अतिरिक्त दीड ते दोन टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. उंची वाढवण्यासाठी भूसंपादन, गावांचे पुनर्वसन करावे लागणार आदींसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्याचे आदेश टाटा कंपनीला दिले आहेत. धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पीएमआरडीए क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी, असे आदेश पवार यांनी दिले आहेत. मुळशी धरण हे ब्रिटिश कालीन धरण आहे. हे धरण खासगी मालकीचे असून टाटा कंपनीकडे या धरणाची मालकी आहे. या धरणातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. या धरणाची एकूण क्षमता सुमारे 18.50 टीएमसी इतकी आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यात नवीन धरण बांधण्यासाठी कोणती जागा शिल्लक नाही. त्यामुळे वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याच्या पर्याय पुढे आला आहे. मुळशी धरणाची उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या मालकीची आहे. तर उर्वरित 20 टक्के जमीन शासनाकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी योग्य तो मोबदला दिला जाणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे
किती गावे बाधित होणार, किती जागा जाणा, मूळ शेतकरी किती आहेत, घरे किती बाधित होणार, ही सर्व माहिती सर्वेक्षणातून समोर येणार आहे. याद्वारे सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे, साधारणपणे जूनमध्ये याबाबत पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.