बूस्टर डोससाठी फोन आला, तर व्हा सतर्क; पोलिसांकडून जागृती

जुन्नर  – सायबर हॅकरकडून फसवणुकीचा नवीन फंडा अवलंबविला जात आहे. फोनवर करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची अचूक तारीख सांगत त्यानंतर ओमायक्रॉन टाळण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोससाठी विनंती हॅकर करेल, ओटीपी पाठवल्यानंतर मोबाइल हॅक करत बॅंक खात्यातून रक्कम लांबवत फसवणूक होते. फसवणूक टाळण्यासाठी आळेफाटा पोलीस जनजागृती करत आहेत.

या प्रकारात हॅकर कॉल करत फोनवरील व्यक्तीस त्याच्या लसीकरणाची अचूक तारीख सांगून बूस्टर डोससाठी विनंती करत डोस नोंदणीच्या नावावर ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी विचारतो. ओटीपी दिल्यानंतर संबंधिताचे बॅंक खाते हॅक करत रक्कम काढून घेतो. 

बूस्टर डोससाठी मोबाइलवर येणारे कॉल फसवे आहेत. तुम्हाला कोणी डोससाठी विनंती करत असेल अथवा ओटीपी पाठवला असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नका. हा हॅकिंगचा नवीन फंडा आहे.