करोनाबाधित तिघांवर ‘एचआयव्ही’ प्रतिबंधात्मक औषधांचा परिणाम

आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती

पुणे – राज्यासह देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाबाधित रुग्णांना उपचार देताना “एचआयव्ही’ची प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येत असून त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.

राज्यात तीन रुग्णांना ही प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली असून, गंभीर रुग्णांना ही औषधे देता येऊ शकतील, असा निर्वाळा राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिला. त्यामुळे चीनपाठोपाठ आता महाराष्ट्रात करोनाच्या संसर्गित रुग्णांना “एचआयव्ही’ प्रतिबंधित दोन औषधे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करोना रुग्णांना चीनमध्ये एचआयव्ही प्रतिबंधित (एआरटी) औषधे देण्यात आली. त्याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) कळवण्यात आले आहे. त्यामुळे देशात “एचआयव्ही’ची औषधे “करोना’बाधित रुग्णांना देण्यात येणार की नाही, याबाबत संदिग्धता होती.

त्याबाबत डॉ. पाटील यांनी माहिती दिली. सध्या करोना विषाणूच्या रुग्णाला लक्षणांनुसार उपचार दिले जात आहेत. त्यावर विशेष असे औषध उपलब्ध नाही. मात्र, एचआयव्ही विषाणू प्रतिबंधक औषधे (एआरटी) ही करोनाच्या बाधित गंभीर रुग्णाला देता येऊ शकतात, डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment