विकासकामे, योजनांची गतीने अंमलबजावणी करा

सातारा – जिल्हा परिषदेमार्फत होणारी विकासकामे, राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी दिल्या. दरम्यान, लंपी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग गतीने उपाययोजना राबवत असून पशुपालकांना नुकसानभरपाई मंजूर करण्यासाठी आठवड्यातून दोन बैठका घेण्यात येतील, अशी माहिती श्री. खिलारी यांनी यावेळी दिली.

जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झाली. याप्रसंगी त्यांनी प्रशासनात गतीमानता आणण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्‍न गतीने सोडवण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. विकासकामे करताना, योजना राबवताना सर्वांनी गतीने काम करण्याची गरज आहे.

कामांचा दर्जा चांगला राहील यावर लक्ष द्यावे, अशी सूचना श्री. खिलारे यांनी केली. लंपी स्किनने प्रारंभी संख्या वाढली असली तरी सध्या या रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. जनावरांचे लसीकरण चांगले झाले असून पशुसंवर्धन विभागाने योग्य पध्दतीने उपाययोजना राबवल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे त्यांना मदत देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. सानुग्रह अनुदान मंजूर करण्यासाठी आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार अशा दोन वेळा बैठका घेण्याच्या सूचनाही खिलारी यांनी केल्या.

12 विषय मंजूर, एक स्थगित
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत विषय पत्रिकेवरील 13 विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सभेत 12 विषयांना मंजुरी देण्यात आली. कृषी विभागाकडील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मोबाइल ऍप विकसित करण्याबाबतचा विषय तात्पुरता स्थगित करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी हे ऍप गरजेचे असून ऍपबाबत परिपूर्ण माहिती घेऊन चांगल्या दर्जाचे काम करता येईल अशी सूचना ज्ञानेश्‍वर खिलारे यांनी मांडली. हा विषय तात्पुरता स्थगित ठेवून नव्याने ऍपची माहिती घेऊन पुन्हा विषय सादर करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.