आरोपीला अमर्यादीत काळासाठी कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन – HC

पुणे – खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला. आकाश सतिश चंडालिया असे त्याचे नाव आहे.

त्याचा वतीने ऍड. सना खान यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपीवरील आरोपांचे गांभीर्य आणि त्याच्याविरोधातील खटला निकाली निघायला लागणाऱ्या प्रदीर्घ काळाचा विचार करता दोन्हींमध्ये समतोल राखण्याची आवश्‍यकता आहे, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आदेशात नमुद केले आहे.

25 सप्टेंबर 2015 रोजी त्याला लोणावळा पोलिसांनी अटक केली. अपहर करून खूनासह पुरावा नष्ट करणे, संगणमतसह विविध कलमानी गुन्हा दाखल आहे. 14 डिसेंबर 2015 रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तेव्हापासून तो कारागृहात आहे. नजीकच्या काळात खटला निकाली निघण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन देण्याशिवाय पर्याय नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले अहे.