अतिविश्‍वास टाकल्याचा इम्रान खान यांना होतोय पश्‍चाताप; पाकचे तत्कालीन लष्करप्रमुख बाजवांवर गंभीर आरोप

इस्लामाबाद – सध्या तुरूंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरिक ए इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांच्या संदर्भातील एक बातमी डॉन या वर्तमान पत्राने दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इम्रान खान सत्तेत असताना त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर अतिविश्‍वास टाकला व त्याचाच त्यांना आता पश्‍चाताप होतो आहे.

आपल्याला तुरूंगात टाकण्याबद्दल त्यांनी बाजवा यांनाच दोषी ठरवले आहे. पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर टीका करताना इम्रान म्हणाले की जनरल बाजवावर विश्‍वास ठेवला हे माझे एकमेव दु:ख आहे. लष्करप्रमुख म्हणून दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांनी (बाजवा) असत्याचा आणि खोट्या आरोपांचा सहारा घेतला.

हे सगळे बाजवांनीच केले होते याची मला खात्री आहे. यासाठी मी अन्य कोणाला जबाबदार धरत नाही. त्यांनी अत्यंत काळजीने ही योजना बनवली आणि तिची अंमलबजावणी केली. एक विश्‍वासाघाती व्यक्ती म्हणून त्यांनी स्वत:ला सादर केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अराजकता निर्माण करण्यासाठी बाजवांनी खोटी विधाने केली. हे केवळ त्यांनी त्यांना मिळालेली मुदतवाढ सुरक्षित करण्यासाठीच केले.

वास्तविक इम्रान खान यांनीच २०१९ मध्ये बाजवा यांना मुदतवाढ दिली होती. मात्र २०२२ मध्ये त्यांनी ही आपली चूक होती असेही एका मुलाखतीत कबुल केले होते. तुम्हाला पदावरून हटवण्यात अमेरिकेचा हात होता का असे इम्रान यांना विचारल्यावर त्यांनी याचा दोषही बाजवा यांच्या माथी मारला.

ते म्हणाले जनरल बाजवा यांनी एकट्यानेच माझ्या विरोधात अमेरिका आणि अन्य देशांत कंड्या पिकवल्या. खोट्या गोष्टी पसरवल्या. मी अमेरिका विरोधी आहे व त्या देशासोबत चांगले संबंध मला नको आहेत अशी चुकीची माहिती त्यांनी पसरवली. हे केवळ त्यांची सत्तेची अतृप्त हाव पूर्ण करण्यासाठी त्यांनी केले.

चीनी दुकानात बैल अशीही त्यांनी बाजवा यांच्या कामांची संभावना केली. पाकिस्तानात कायद्याचे राज्य असावे याबाबतची आपली कटीबध्दता व्यक्त करतानाच त्यांनी त्यांना झालेली कैद पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

आपण सातत्याने लोकशाही आणि न्यायासाठी लढलो आहोत. मात्र मला झालेली कैद ही बाजवा यांनी आयोजित केलेल्या राजकीय सूडाचा एक परिणाम होती, अन्य काही नाही असेही त्यांनी सूचित केले.

पाकिस्तानातील विद्यमान सरकारला मान्यता देण्यास नकार देताना त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दडपशाहीच्या विरोधात लढण्याचे आणि पाकिस्तानातील सत्ताधारी अभिजात वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात विश्‍वासाची जी दरी आहे ती दृगोच्चर करण्याचे आवाहन केले.

हा केवळ इम्रान खानचा प्रश्‍न नाही तर २५ कोटी लोकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा प्रश्‍न आहे. आपली लोकप्रियता ही आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि निष्ठेमुळे आहे आणि पैसा मला खरेदी करू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही असे ते म्हणाले.