आंबेगावातही डोळ्यांच्या साथीचा शिरकाव ; काळजी घेण्याचे डॉक्‍टरांचे आवाहन

रांजणी – डेंग्यू सदृश्‍य साथीच्या आजाराचे संकट कायम असताना आता आंबेगाव तालुक्‍यात संसर्गजन्य डोळ्यांच्या आजाराची साथ आली आहे. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः प्रथम एकाच डोळ्याला होता; मात्र एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होत आहे. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.

गेल्या आठवडाभरापासून तालुक्‍यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामध्ये आता नेत्र संसर्गाचाही समावेश झाला आहे. तालुक्‍यात खासगी रुग्णालयांमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसून येते. कधी ढगाळ वातावरण, मध्येच पडणारे ऊन, अधूनमधून कोसळणारा पाऊस असे बदल सातत्याने होत आहेत. त्यामुळे वातावरणातील दमटपणा संसर्गजन्य रोगासाठी पोषक ठरत आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात इतर आजारांबरोबर नेत्र संसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरलेली दिसून येते.

डोळे आले आहेत हे ओळखायचे झाले तर डोळ्यात सतत काहीतरी गेल्याची भावना होणे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात. संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांना आतील भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात.

डोळ्यातून पाणी येऊन किंवा घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतात. काही वेळा डोळ्यांना खाज येते, डोळे जड वाटतात, एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही. डोळे आल्यानंतर काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांना वारंवार हात लावू नये, हात वारंवार साबणाने स्वच्छ करणे गरजेचे आहे.

रोज स्वच्छ रुमाल आणि टॉवेल वापरणे देखील गरजेचे आहे. वापरलेला रुमाल आणि टॉवेल इतरांना देऊ नये. दुसऱ्यांनी दिलेला रुमाल किंवा टॉवेल वापरू नये, त्यामुळे डोळे आल्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन डोळे बरे होऊ शकतात.

डोळ्यांचा आजार बरा होण्यासाठी साधारणतः तीन ते चार दिवस लागतात. अशा वेळी लहान मुलांना डोळे आले असल्यास त्यांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे. नेत्र तज्ज्ञांना डोळे दाखवून त्याबाबत औषधोपचार करून घ्यावे. डोळे आणि हात स्वच्छ धुवावेत त्याचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

– डॉ. सचिन गाडे, नेत्ररोग तज्ज्ञ, मंचर