दिल्लीत अमोल कोल्हे ठरतायत पवारांचं ‘ब्रह्मास्त्र; आता आंदोलक शेतकऱ्यांची घेणार भेट

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या धोरणं आणि निर्णयांवर कडक शब्दात टीका केली. तसेच शेतकरी आंदोलन आणि नवीन संसदेच्या निर्मितीवर मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला केले. आता ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार कोल्हे यांची आक्रमकता पाहता, ते दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे ब्रह्मास्त्र ठरत असल्याचे चित्र आहे.

अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारचा समाचार घेताना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांची डॉ. कोल्हे भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेणार आहेत.  गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला त्यांना भेटायला जाणार आहोत. यामध्ये राजकीय हेतू नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

 

शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कायदे आहेत, असं सरकार सांगते पण हे कायदे जर फायद्याचे असते तर शेतकऱ्यांनी आंदोलन का केले असते? हे सरकारने समजून घ्यायला हवं. सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चेष्टेचा विषय होणार नाही. यावेळी कोल्हे यांनी मोदींनी उच्चारलेल्या आंदोलनजीवी शब्दावर कडाडून टीका केली. देशाच्या प्रमुखांनी आंदोलनजीवी सारखा शब्द वापरणे हे या देशाचं दुर्दैव असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.

Leave a Comment