गडचिरोली जिल्ह्यातही पुराची परिस्थिती: भामरागडला आले बेटाचे स्वरुप

गडचिरोली : राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातही मागच्या 48 तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पुर आला आहे. याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे जवळपास 100 घरे आणि 40 दुकानं पाण्याखाली गेले आहेत. मागच्या 15 दिवसांत पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पुर आला असून इथले जनजीवन पुर्णपणे विस्कळित झाले आहे.

पाण्याच्या पातळीत रात्रीपासून वाढ होत असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आल्लापल्ली-भामरागड मार्गावरील कुंभारगडा नाल्याच्या पाण्याची पातळी वाढल्याने जवळपास 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अहेरीवरून भामरागडला जाणाऱ्या एसटी बसेस सोमवारपासून भामरागडमध्येच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Leave a Comment