ग्रीसमध्ये पंतप्रधानांच्या पक्षाचा विजय मात्र बहुमत गाठण्यात अपयश

अथेन्स – ग्रीसमध्ये पंतप्रधान क्‍यारियाकोस मित्सोताकिस यांच्या पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय झाला आहे. मात्र, त्यांना संसदेत बहुमत गाठणे शक्‍य झालेले नाही.

मित्सोताकिस यांच्या न्यू डेमोक्रसी पार्टीला निवडणुकीत 40.83 टक्के मते मिळाली. तर डाव्या विचारसरणीच्या अलेक्‍सीस सिप्रास यांच्या सिरीझा पार्टीला 20.1 टक्के मते मिळाली. संसदेत निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी न्यू डेमोक्रसी पार्टीला 6 जागा कमी आहेत. त्यामुळे पंतप्रधान मित्सोताकिस यांना आघाडी सरकार स्थापन करावे लागणार आहे. अन्यथा पूर्ण बहुमतासाठी नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत, असा अंदाज ग्रीसच्या गृहमंत्रालयाने वर्तवला आहे.

ग्रीसच्या निवडणुकांमधील हा निकाल म्हणजे एक भूकंप असल्याचे मित्सोताकिस यांनी म्हटले आहे. संसदेमध्ये पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील असे संकेत त्यांनी दिले आहेत.

नव्या कायद्यांतर्गत झालेल्या निवडणुका
ग्रीसमधील या निवडणुका नव्याने लागू करण्यात आलेल्या प्रमाण प्रतिनिधित्वाच्या कायद्यांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या कायद्यामुळे कोणत्याही एका पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी स्वतःच्या बळावर पुरेशा संख्येने संसदेतील जागांवर विजय मिळवणे अवघड झाले आहे. नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या तर त्या जूनच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. तेव्हा हा कायदा बदललेला असेल. तेव्हा अधिक जागांवर विजय मिळवणाऱ्या पक्षाला “बोनस’ म्हणून अन्य जागा मिळू शकतील. त्यामुळे जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला बहुमत मिळवणे शक्‍य होईल.