कर्जत तालुक्‍यात अवकाळीमुळे द्राक्षबागा उद्‌ध्वस्त; हातातोंडाशी आलेला घास हिरावला

कर्जत – शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने तालुक्‍यातील खांडवी परिसरात कहर केला. येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने व गारपिटीने हिरावून घेतला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांना जबर फटका बसला असून येथील द्राक्ष बाग भुसापट झाली आहे. त्यामुळे आर्थिक कणा मोडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाने आर्थिक मदत न केल्यास आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याची आर्त हाक दिली आहे.

खांडवी परिसरात अवकाळी पावसाबरोबर जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असून यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. फळबागा, भाजीपाला, कांदा, मका, जणांवराचा चारा इत्यादींचे नुकसान झाले आहे. या आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पार कोलमडला आहे. शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्‍यातील खांडवी मधील भवानीनगर परिसरातील शेतकरी नेमीचंद बाबासाहेब तापकीर यांची अडीच एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे.

तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्रूर होत हिरावून घेतल्याने येथील शेतकरी उद्धवस्त झाला आहे. द्राक्षबाग वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने या शेतकऱ्याचे सुमारे 50 ते 55 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्जाचे ओझे घेऊन बागेला मुलाबाळांसारखा जीव लावणाऱ्या शेतकऱ्यांची बाग पावसाने उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्याने टाहो फोडलो. तसेच या अवकाळीने रावसाहेब संभाजी तापकीर यांच्या एक एकर डाळिंब बागेचे, कैलास विठोबा तापकीर यांच्या लिंबू बागेचे, लक्ष्मण मारुती तापकीर यांच्या घरकुलाचे पत्रे उडाले असून कापून ठेवलेला कांदा भिजला आहे.

कुंडलिक बापूराव तापकीर यांच्या शेतातील झाकलेला कांदा वादळाने कागद उडून गेल्याने सुमारे 200 क्विंटल कांदा अवकाळी पावसाने भिजला आहे. आणि डाळिंब बागेत आलेल्या फळांची वादळी वाऱ्याने फरपंड झाली आहे. बाळासाहेब पंढरीनाथ तापकीर यांचे टोमॅटो व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकणवाडी येथील संजय अंबादास खुडे यांच्या घराचे पत्रे देखील उडून गेले आहेत.

तापकीर कुटुंबीयांचा फोडला टाहो
जीवापाड जपलेली, हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग निसर्गाने गिळंकृत केल्याचे पाहून तापकीर कुटुंबीयांनी यावेळी टाहो फोडला. बाग नेण्यासाठी व्यापारी येणार होते पण त्याआधीच अवकाळीने बाग भुईसपाट झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी बाग पाहण्यासाठी आलेले शेतकरी हे सर्व पाहून भावुक झाले होते.