मेळघाटात अंधश्रद्धेतून बाळाला गरम विळ्याचे चटके

अमरावती – अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी गावात झालेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले आहेत. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

चिखलदरा पोलिसांनी मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्‍याम सज्जु तोटा असे या आठ महिन्यांच्या बाळाचे नाव आहे. या बाळाला आठ दिवसांपासून ताप, खोकला आणि त्याचे पोट फुगत होते. अशा पोट फुगीला आदिवासी “फोपसा’ म्हणतात. पण या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील 16 जून रोजी त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले.

हा प्रकार समोर आल्यानंतर काटकुंभ येथील भरारी पथक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बाळाला उपचारांसाठी चुरनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या बालकावर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment