राजस्थान: गर्भवती महिलेची पती अन् सासरच्यांकडून विवस्त्र करून गावभर धिंड; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका गर्भवती महिलेला विवस्त्र करून रस्त्यावर फिरल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीला विवस्त्र करून गावातील रस्त्यावरून फिरवल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. त्यावेळी ही महिला मदतीसाठी आर्त हाक देत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी समोर आले नाही. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 6 आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथके तयार केली आहेत.

राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे’ असंही पोलिसांनी म्हटले आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्यांनी तिची नग्न धिंड काढली. ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहत होती. त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात आले. तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करुन तिला विवस्त्र केले आणि त्यानंतर तिची धिंड काढली धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून ती किंचाळत आहे. मात्र गावकरी बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवरा महिलेचे कपडे फाडतोय, गावकऱ्यांसमोर स्वतःच्या पत्नीला विवस्त्र करतोय असे दृश तिथे उपस्थित लोकांनी टिपले आहे. यात सर्वात वाईट बाब म्हणजे, महिलेला वाचवण्यासाठी गावातील कोणीही पुढे आले नाहीत. गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवत असल्याचे पाहायला मिळाले.

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेसाठी सहा पथके तयार करण्यात आले आहेत. अशी माहिती एसीपी अमित कुमार यांनी दिली. एसीपी अमित कुमार यांनी गावात तळ ठोकला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी ट्विट केले आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका वादावरून महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येणार असून लवकरात लवकर शिक्षा होईल असे यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे.