देशात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत दुपटीने वाढ ; सर्वात श्रीमंत ठरला ‘हा’ पक्ष

नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं देशातील राजकीय पक्षांच्या संपत्तीचा लेखाजोखा मांडला आहे. या संस्थेने याविषयीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांची संपत्ती दुपट्टीने वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहवालातील माहितीनुसार,भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष ठरला आहे.

या संस्थेच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे देशातील राजकीय पक्षांबाबत आर्थिक जमाखर्चाच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला असून त्याचा अहवाल नुकताच एडीआरने प्रकाशित केला आहे. या अहवालातून देशातील ८ प्रमुख पक्षांच्या आर्थिक स्थितीविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. या ८ पक्षांमध्ये भाजपा व काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, भाकप, माकप, तृणमूल काँग्रेस व एनपीईपी या राष्ट्रीय पक्षांचा समावेश आहे. या अहवालाचे सविस्तर वृत्त संकेतस्थळावर दिले आहे.

देशातील प्रमुख ८ राष्ट्रीय पक्षांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात निवडणूक यंत्रणेकडे आपल्या आर्थिक संपत्तीविषयीची माहिती जमा केली आहे. या माहितीच्या आधारे एडीआरने तयार केलेल्या अहवालानुसार, या आठ पक्षांनी मिळून एकूण ८ हजार ८२९ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात हा आकडा ७,२९७.६२ कोटी इतका होता.

या अहवालानुसार, भाजपाची संपत्ती २०२१-२२मध्ये ६,०४६.८१ कोटी इतकी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधीच्या वर्षी हाच आकडा ४,९९० कोटी इतका होता. त्यामुळे २०२१-२२ या वर्षी भाजपाच्या संपत्तीमध्ये २१.१७ टक्क्यांची वाढ झाल्याचं या अहवालात म्हटले आहे. भाजपाप्रमाणेच काँग्रेसच्या संपत्तीतही १६.५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पक्षाची एकूण संपत्ती ६९१.११ कोटींवरून ८०५.६८ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, भाजपा व काँग्रेसची संपत्ती वाढली असताना बसपा हा या ८ पक्षांमधला एकमेव पक्ष आहे ज्याची संपत्ती याच काळात वाढली नसून घटली आहे. ही घट ५.७४ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. यानुसार त्यांची संपत्ती ६९०.७१ कोटींवरून ७३२.७९ कोटी झाल्याचे वृत्तात नमूद केले आहे. २०२०-२१ मध्ये तृणमूल काँग्रेसची एकूण संपत्ती १८२.००१ कोटी इतकी होती. पुढच्याच वर्षी त्यात १५१.७० टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात हा आकडा ४५८.१० कोटींपर्यंत पोहोचला.