नवे गार्ड घ्या, नवी इनिंग सुरु करा

पुणे – अखेर 2020 साल संपले, आता नव्या जोमाने पुन्हा गार्ड घ्या आणि नवी इंनिंग सुरू करा, अशा क्रिकेटच्या परिभाषेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संदेश देताना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ऑनलाइन संवादात सचिनने आपले मतही यावेळी व्यक्त केले. 

मानवाची मर्यादा 2020 सालाने दाखवून दिली. निसर्गाला गृहित धरू नका, त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहिले. यातून आता बोध घेण्याची गरज आहे. एक अदृष्य विषाणू काय घडवू शकतो याची अनुभूती आपण सगळ्यांनीच अनुभवली. जे घडले ते अनपेक्षित होते. मात्र, निराश न होता पुन्हा नवे गार्ड घ्या आणि नवी इनिंग सुरू करा, अशा शब्दात सचिनने आपला संदेश दिला आहे.

नवे वर्ष अधिक सुरक्षीत असेल अशी आशा करु या. गेल्या वर्षी जो अनुभव घेतला त्यातून बोध घेत नव्या वर्षात वाटचाल करा. नात्यांचे महत्व व अस्तित्व ओळखले पाहिजे, गेल्या वर्षी जरी घरातच बसून राहावे लागले असले तरीही त्यातून एकमेकांमधील नाते संबंध आणखी घट्ट बनले आहेत, हे देखील महत्वाचे आहे.

आपल्यासाठी कायम तत्पर असलेल्यांच्या कायम संपर्कात राहणे आवश्‍यक आहे. हेच आपण गेल्या वर्षीच्या अनुभवातून शिकलो. आता स्वतःची व कुटुंबाची नेहमी काळजी घेणे आवश्‍यक आहे. नवे वर्ष, नव्या आशा घेऊन आले आहे, त्याचे स्वागत करा. आनंदी राहा व दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, असेही सचिनने आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Comment