इंदापुरात पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

अंकिता पाटील यांना कॉंग्रेसची उमेदवारी : जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गट पोटनिवडणूक

बावडा – इंदापूर तालुक्‍यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत रत्नप्रभा देवींच्या नात व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून गुरुवारी (दि.6) सकाळी 10:30 वाजता अंकिता पाटील इंदापूर तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बावडा-लाखेवाडी गटाच्या कॉंग्रेस पक्षाच्या जि.प.सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे सदर जागेसाठी दि.23 जूनला पोटनिवडणूक होत आहे. अंकिता पाटील ह्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या नात असून त्यांचे शिक्षण परदेशात झाले असून त्या उच्चशिक्षित आहेत. युवा, सर्वसमावेशक कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांना बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी जाहीर झाल्याने बावड्याच्या पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीचा हा राजकीय प्रवेश मानला जात आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व इंडियन शुगर मिल्स असोसिएशन इंडियाच्या सदस्या म्हणूनही कु. अंकिता हर्षवर्धन पाटील सध्या काम पाहत आहेत. कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी मी काम करणार आहे. उच्च शिक्षित पिढीने राजकारणात सक्रियपणे पुढे आले पाहीजे, राजकारण हे जनतेच्या विकासकामांसाठी आवश्‍यक असणारे प्रभावी व्यासपीठ आहे, असे अंकिता पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे.तसेच इतर राजकीय पक्षही पाठिंबा देण्याची शक्‍यता राजकीय निरिक्षक व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment