‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश

मुंबई, – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित  उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे.

राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.