वाहन कंपन्याकडून देखभालीच्या मुदतीत वाढ

मुंबई – सध्या करोना व्हायरसमुळे ग्राहकांना आपली वाहने सर्विसिंगसाठी वितरकाकडे नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे वाहन कंपन्या मोफत सर्विससिंगचा कालावधी वाढवीत आहे.
बजाज ऑटो कंपनीने मोफत सर्विसिंगचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढविला आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्यांची फ्री सर्विसिंगची मुदत 1 एप्रिल ते 31 मेदरम्यान संपत होती. त्यांना 31 जुलैपर्यंत फ्री सर्विसिंग करता येणार आहे.

याबाबत बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी सांगितले की, बऱ्याच राज्यातील निर्बंधामुळे ग्राहक अडचणीत आहेत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे आता फ्री सर्विसिां कालावधीत दोन महिन्यांनी वाढविला आहे. यासंदर्भात कंपनीने आपल्या वितरकांना आवश्‍यक त्या सूचना दिल्या आहेत.

अशाच प्रकारचा निर्णय टाटा मोटर्स या कंपनीने घेतला आहे. टाटा मोटर्स कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की ज्या ग्राहकांची फ्री सर्विसिंची मुदत एक एप्रिल ते 30 जून दरम्यान संपत होती त्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. टाटा मोटर्सच्या देशभरातील ग्राहकांना या नव्या सुविधेचा लाभ होणार असल्याचे टाटा मोटर्सने या पत्रकात नमूद केले आहे.

ऑडि या कंपनीनेही आपला फ्री सर्विसिंगचा कालावधी 30 जून पर्यंत वाढविला असल्याचे एका पत्रकात नमूद केले आहे. यांचा फ्री सर्विसिंगचा कालावधी एप्रिल आणि मे महिन्यात संपत होता, त्यांना आता 30 जून पर्यंत फ्री सर्विसिंग मिळणार आहे.