हरियाणाच्या बजेटमध्ये ज्येष्ठांचे पेन्शन वाढवले

चंदीगड – हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने आपले बजेट डिजिटल स्वरूपात मांडले असून त्यात केलेल्या काही तरतूदी पाहता राज्यातील भारतीय जनता पार्टी सरकारने आतापासून निवडणुकांच्या तयारीला सुरूवात केली असल्याचे मानले जाते आहे.

खट्टर सरकारच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणाऱ्या पेन्शनची रक्कम 2500 रूपये दरमहा करण्यात आली आहे. तसेच 9 ते 12 पर्यंतचे शिक्षणही मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, हरियाणा सरकारच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे देशातील बहुतेक एकमेव हे राज्य असे आहे की करोनाच्या संकटकाळातही गेल्या वर्षी या राज्याच्या महसूलात 11. 6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारला 40 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घेता येण्याची मुभा होती. असे असतानाही राज्याने नव्या कर्जाचा आकडा 30 हजारांच्या आतच ठेवला आहे. दरम्यान, गुंतवणुकीच्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याचा इरादा राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाहीर केला आहे. मात्र विरोधी पक्षाचे नेते भूपिंदर हुडा यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. या बजेटमधून काहीही साध्य होणार नसून केवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचाच हा प्रकार असल्याचे हुडा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment