मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय अंधुकपणा

मायोपिया आजाराचा धोका : वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होमचा परिणाम

पिंपरी – शहरातील करोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र या करोनाचा फटका फक्त बाधितांनाच नाही तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही बसला आहे. खासकरून मुलांना स्कूल फ्रॉम होम असल्याने त्यांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप व मोबाइलवर जात आहे. या स्क्रीन वेळेचा विपरीत परिणाम होत आहे. मायोपिया म्हणजेच अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये
यामुळे वाढ होत आहे.

करोनाच्या काळात सुरुवातीला लॉकडाऊन असल्याने पालक घरीच होते. आजही अनेकजण घरूनच काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळाही ऑनलाइन सुरू आहेत. काही शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे संपूर्ण तास ऑनलाइन घेतले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जास्तीजास्त वेळ संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर जात आहे. याचा जास्तीतजास्त वापर केल्याने जवळच्या वस्तू दिसत असल्या तरी लांबच्या वस्तू दिसण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे अंधूकपणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. 

अनेक तरुण व इतर नागरिक वर्क फ्रॉम होम करत आहेत. ते घरूनच संगणक किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने काम करत आहेत. त्यामुळे त्यांचाही जास्तीजास्त वेळ या गॅझेटचा वापर करण्यामध्ये जात आहे. त्यामुळे त्यांनाही या आजाराचा धोका वाढला आहे. जीवनसत्वयुक्त नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या उद्‌भवत आहेत. तसेच मोबाइलचा जास्तीतजास्त वापरही याला कारणीभूत ठरत असल्याचे नेत्रतज्ज्ञाचे म्हणणे आहे. मायोपिया असलेल्या व्यक्तीला जवळचे दिसते मात्र त्यांना दूरच्या वस्तू दिसत नाहीत. मोबाइल व संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांचे स्नायू कुमकुवत होतात. त्यामुळे देखील मायोपिया होण्याची शक्‍यता जास्त असते.

मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलेही मोबाइल व लॅपटॉपचा वापर करत आहेत. मायोपियाचे मूलभूत कारण अनुवंशिकता किंवा परिस्थितीजनक घटक असतात. मायोपिया वाढवणाऱ्या घटकांमध्ये सततचे जवळच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करणे हे कारण असते. त्यामध्ये मोबाइल व लॅपटॉपवर अति काम करणे याचाही समावेश असतो. मायोपियामध्ये नेत्रगोलकांची लांबी सर्वसामान्यतः जास्त असते. किंवा लेन्सच्या आकारात बदल असू शकतो. मायोपियाचे निदान डोळ्यांच्या तपासणीद्वारे होते. लहान मुलांना जास्त वेळ मोबाइल किंवा संगणकाचा अतिरिक्त वापर केल्याने मायोपिया वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोबाइल, संगणक, लॅपटॉप व टीव्हीचा अति वापर टाळावा.
– डॉ. अभिजित अग्रे, नेत्ररोगतज्ज्ञ

Leave a Comment