#INDvAUS 3rd T20 : भारताचा मालिका विजय; निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून मात

हैदराबाद – विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना हार्दिक पंड्याने केलेली वादळी फलंदाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील रविवारी येथे झालेल्या निर्णायक लढतीत 6 गडी राखून पराभव केला व मालिका विजयही साकार केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 187 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक चेडू बाकी ठेवून पूर्ण केले.

विजयासाठी आवश्‍यक धावांचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर लोकेश राहुलने पुन्हा एकदा निराशा केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला साथिला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याधीच्या सामन्यात वादळी खेळी केलेला रोहित 14 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावून 17 धावांवर परतला.

यावेळी खेळपट्टीवर आलेल्या सूर्यकुमार यादवने घणाघाती फलंदाजी केली. त्याने अवघ्या 29 चेंडत अर्धशतक साकार केले. त्यानंतर त्याने कोहलीला सुरेख साथ देत शतकी भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. सूर्यकुमारला पुन्हा एकदा आततायी फटका भोवला व तो 36 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी करुन बाद झाला.

दरम्यान कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने पंड्याच्या साथित संघाचे दीडशतक पूर्ण केले व विजयाची आशा आणखी भक्कम केली. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. तो 48 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार फटकावून 63 धावांवर बाद झाला. त्यावेळी एका बाजूने पंड्याने सामन्याची सुत्रे आपल्या हाती कायम राखली होती. त्याने दीनेश कार्तिकला साथिला घेत धावांचा वेग वाढवला.

अखेरच्या षटकांत विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्याने ही औपचारीकता पूर्ण करताना संघाचा विजय साकार करताना मालिकाही 2-1 अशी जिंकून दिली. पंड्याने 16 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह नाबाद 25 धावांची खेळी केली. कार्तिक 1 धाव काढून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, सलामीवीर फलंदाज कॅमेरुन ग्रीनने केलेल्या वादळी अर्धशतकी खेळीनंतर अक्‍सर पटेल व यजुवेंद्र चहल यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत झाली होती. मात्र, तळातील फलंदाज टीम डेव्हीड व डॅनियल सॅम्स यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 186 अशी मोठी धावसंख्या उभारली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. पहिल्या सामन्यात वादळी फलंदाजी केलेल्या कॅमेरुन ग्रीनने याही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने कर्णधार ऍरन फिंचच्या साथीत संघाला 44 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर गोलंदाजीत केलेला बदल यशस्वी ठरला व फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेल आणि यजुवेंद्र चहलने त्यांच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली.

एकवेळ 1 बाद 44 अशा स्थितीतून त्यांचा डाव 4 बाद 84 असा घरसला. फिंचसह स्टिव्हन स्मिथ व ग्लेन मॅक्‍सवेल यांनी साफ निराशा केली. ग्रीनने दमदार अर्धशतकी खेळी करत 21 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या मात्र, तो बाद झाल्यावर त्यांची धावगती खालावली. धडाकेबाद फलंदाज मॅथ्यु वेडही अपयशी ठरला. त्यावेळी जोस इंग्लिसने 24 धावा करत टीम डेव्हिडला सुरेख साथ दिली. तो बाद झाल्यावर डेव्हीडने डॅनियल सॅम्ससह संघाचे दीडशतक फलकावर लावले. या जोडीने सातव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली.

डेव्हीडही अर्धशतकी खेळीनंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 54 धावांवर परतला. त्याने या खेळीत 27 चेंडूत 2 चौकार व 4 षटकार फटकावले. सॅम्सनेही आक्रमक खेळी करताना नाबाद 28 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकार फटकावले. भारताकडून अक्‍सर पटेलने 3 गडी बाद केले. यजुवेंद्र चहल, भुवनेश्‍वर कुमार व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या जागी भुवनेश्‍वर कुमारला संधी देण्यात आली.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 7 बाद 186 धावा. (टीम डेव्हीड 54, कॅमेरुन ग्रीन 52, जोस इंग्लिस 24, डॅनियल सॅम्स नाबाद 28, अक्‍सर पटेल 3-33)
भारत – 19.5 षटकांत 4 बाद 187 धावा. (सूर्यकुमार यादव 69, विराट कोहली 63, रोहित शर्मा 17, हार्दिक पंड्या नाबाद 25, दीनेश कार्तिक नाबाद 1, डॅनियल सॅम्स 2-33).