T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…

T20 World Cup 2024 (IND vs PAK  Match Update) :  टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात रविवारी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत संघाला पाकवर 6 धावांनी विजय मिळवूूून दिला.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला 19 षटकांत सर्वबाद केवळ 119 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानची धावसंख्या 13व्या षटकात 2 बाद 73 धावांपर्यंत पोहोचली होती. असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी डाव फिरवला. 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 113 धावाच करू शकला.

पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता.26 च्या स्कोअरवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. पाचव्या षटकात बुमराहने बाबर आझमला स्लिपमध्ये सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. बाबर आझम केवळ 13 धावा करून लवकर बाद झाला.पाकिस्तानला 11व्या षटकात 57 धावांवर दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने उस्मान खानला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 13 धावा करता आल्या. पाकिस्तानला 73 धावांवर तिसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याने फखर जमानला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्याला 13 धावा करता आल्या.

एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. पाकिस्तानला 80 धावांवर चौथा धक्का बसला. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रिझवानला क्लीन बोल्ड केले. तो 44 चेंडूत 31 धावा करून बाद झाला.

रिझवान-शादाब बाद झाले. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20 व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती.मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य मध्ये बदलले.

टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला.भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर हार्दिकने दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात तळाच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला 119 धावांपर्यंत मजल मारता आली.

रोहित शर्मा 13 धावा, विराट कोहली चार धावा, अक्षर पटेल 20 धावा, सूर्यकुमार यादव सात धावा, शिवम दुबे तीन धावा करून तर हार्दिक पंड्या सात धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी अर्शदीप सिंग नऊ धावा करून धावबाद झाला. सिराज सात धावा करून नाबाद राहिला.

भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याने 31 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार मारले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.