इंदापूर बॅंकेची निवडणूक बिनविरोध

17 जागांसाठीच अर्ज दाखल : एकहाती सत्ता

इंदापूर – इंदापूर अर्बन को ऑफ बॅंक लिमिटेड इंदापूर या बॅंकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागेसाठी तितकेच म्हणजे 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एकहाती सत्ता इंदापूर अर्बन बॅंकेत निर्माण झालेली आहे.

इंदापूर तालुक्‍यात कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांपूर्वीच रंगतदार झाल्यामुळे, इंदापूर बॅंकेची निवडणूक लागणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते; परंतु बॅंकेच्या स्थापनेपासून भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बॅंक सुरू असल्याने, विरोधी गटाने या बॅंकेच्या निवडणुकीकडे पाठ फिरवली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून अश्‍विनी ठोंबरे, दिपाली खबाले, सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातून संदीप गुळवे, मच्छिंद्र शेटे, सुभाष बोगाणे, मनोज मोरे, स्वप्निल सावंत, संजय जगताप, लालासो सपकाळ, विकास देवकर, गोविंद रणवरे, मिलिंद खाडे, सत्यशील पाटील, तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अविनाश कोथिंमिरे, इतर मागासवर्गीय मतदार संघातून देवराज जाधव, भटक्‍या विमुक्त मधून भागवत पिसे, सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातून संजय रायसोनी यांचेच उमेदवारी अर्ज एकमेव आले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हर्यित तावरे यांनी दिली.

शहा, माने निवडणुकीपासून लांब
इंदापूर अर्बन बॅंकेच्या इतिहासात भरत शहा व विलास माने यांचे योगदान अनन्यसाधारण आहे; मात्र त्यांनी या पंचवार्षिक निवडणुकीत कोठेही भाग न घेता, निवडणुकीपासून लांब राहण्याचा मनोदय केलेला दिसतो. त्यामुळे या संचालक मंडळात अनुभवी चेहरा शोधून काढावा लागणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांना संचालक मंडळात स्थान दिल्यामुळे युवकांना संधी मिळाली आहे.