Dhangar Reservation : …तर हजारो धनगर समाज बांधव जलसमाधी घेतील

इंदापूर (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आमचा लढा सुरू आहे. येत्या पाच डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवावी अन्यथा सोमवारी (दि. 5) डिसेंबर रोजी उजनी धरणात पाच हजार धनगर समाज बांधव जलसमाधी घेतील, असा गर्भित इशारा धनगर ऐक्‍य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यातील सत्तेवर असणाऱ्या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगड व धनगर या शब्दाची दुरुस्ती करण्याची केंद्राकडे तात्काळ शिफारस करावी, या मागणीसाठी इंदापूर शहरातून सोमवारी (दि. 21) इंदापूर तालुक्‍याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी दुचाकी रॅली काढत आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, येळकोट… येळकोट जय मल्हार अशा गगनभेदी घोषणा देत, तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी धनगर ऐक्‍य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे बोलत होते.

इंदापूर शहरातील विरश्री मालोजीराजे भोसले चौकात एकत्रित येत रॅली काढत शक्तिप्रदर्शन करत याबाबतचे निवेदन इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना देण्यात आले.

महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या 75 वर्षांपासून धनगड व धनगर या र आणि ड च्या फरकामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे.तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील बारा जातींच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चारांच्या शब्दांच्या दुरूस्तीचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या या शब्द दुरुस्तीचा निर्णय मंत्रिमंडळाने तातडीने घ्यावा, यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी व समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशी समाजाची मागणी आहे.

राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन केंद्राकडे शिफारस करावी अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल. आतापर्यंत धनगर समाजाने शांत आंदोलने केली. यापुढे जलसमाधी होईल, रेल्वे रोको, रास्ता रोको होईल आणि राज्यकर्त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही. इंदापूर तालुक्‍यातून आज धनगर आरक्षणाची जी ठिणगी पेटली आहे, ती ठिणगी आता राज्यभर पसरणार आहे.

यावेळी हेमंतराव पाटील, अशोक चोरमले, महेंद्र रेडके, कुंडलीक कचरे, दादासाहेब भाळे, विजय वाघमोडे, विशाल मारकड, विजय चोरमले, संजय रुपनवर, अमोल करे, विष्णू पाटील, सिताराम जानकर, आप्पा माने, बाळासाहेब नरूटे, पप्पु तोरवे यांसह तालुक्‍यातील हजारो धनगर बांधव उपस्थित होते.