इंदापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल – राज्यमंत्री भरणे

इंदापूर -इंदापूर तालुक्‍यातील खेळाडूंना अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्यास, खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अडचणी येणार नाहीत. तसेच खेळाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर इंदापूर क्रीडा संकुलामध्ये लॉन टेनिसचे सिंथेटीक मैदान तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर शहरात तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू व नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा संकुलाचा वापर होत असतो. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर क्रीडा संकुल मध्ये, बॉस्केटबॉल मैदान, स्केटिंग ट्रॅक, बॅडमिंटन हॉल, 400 मीटर रनिंग ट्रॅक, क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, धनुर्विद्या, खो-खो मैदान आशा विविध क्रीडा सोयी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

इंदापूर क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक लॉन टेनिस मैदानाची निर्मिती करण्यासाठी पहिल्या टप्यात 31 लाख रुपयांचा निधी सन 2021-22 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक निधीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आला आहे.

तसेच क्रीडा विकासाचा भाग म्हणून सरस्वतीनगर ते क्रीडा संकुल ह्या रस्त्याकरिता 20 लाख रुपयांचा निधी व रस्त्यांच्या बाजूस विद्युतीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.

इंदापूर क्रीडा संकुल येथे इंदापूरकरांसाठी जलतरण तलावासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून, याची मंजूर प्रक्रिया अंतिम टप्यात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडून हे अद्ययावत जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे.