Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 70 हजारांहून कमी रुग्णांची नोंद; मात्र मृतांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली – भारतात करोनाचा कहर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. तब्बल महिनाभरानंतर सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे एक लाखांहून कमी नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 67 हजार 597 नवीन करोना रुग्ण आढळले असून 1 हजार188 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. काल देशात करोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण मिळाले होते आणि 896 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. चांगली बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एक लाख 80 हजार 456 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, म्हणजेच 1 लाख 14 हजार सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.

करोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 23 लाख 39 हजार 611 जणांना लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 4 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 8 लाख 40 हजार लोक बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 9 लाख 94 हजार 891 जणांना अजूनही करोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.