भारत, फ्रान्स आणि युएईचा हवाई युद्धसराव

नवी दिल्ली  – भारत,फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीने अरबी समुद्रामध्ये मोठा हवाई युद्धसराव आयोजित केला होता. हौथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच हा मोठा युद्धसराव आयोजित करण्यात आला होता.

डेझर्ट नाईट नाव असलेला या युद्धसरावामध्ये तिन्ही देशांची अनेक लढाऊ विमाने सहभागी झाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाच्यावतीने या युद्धसरावामध्ये सुखोई-३० एमकेएल, मिग-२९ आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती.

याशिवाय गस्त- टेहळणी विमाने, सी-१३० जे मालवाहू विमाने आणि हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानेही सहभागी झाली होती. तर फ्रान्सच्या बाजूने राफेल , स्पेस फोर्स लढाऊ विमाने आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाची विमानेही या युद्धसरावामध्ये सहभागी झाली होती.

फ्रान्स आणि युएईची विमाने युएईमधील अल-धाफरा हवाई तळावरून या युद्धसरावामध्ये सहभागी झाली होती. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये फ्रान्सची दोन राफेल विमाने सहभागी झाली होती.

त्यापूर्वी एक दिवस आगोदरच हा त्रिस्तरीय हवाई युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. क्षमतावाढ आणि तिन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये आंतर समन्वय निर्माण करणे हा या युद्धसरावाचा मुख्य उद्देश होता. या हवाई युद्धसरावामुळे या हवाई क्षेत्रातील हवाई वाहतूकीवर काही नियंत्रण आणले गेले होते.