ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – स्वदेशी सामग्री आणि सुधारित कार्यक्षमता असलेल्या ब्रह्मोस या स्वनातीत (सुपरसोनिक) क्रूझ क्षेपणास्त्राची आज सकाळी 10.30 वाजता ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस एरोस्पेसने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डिआरडीओ) पथकाशी समन्वय साधून हे प्रक्षेपण करण्यात आले.

ब्रह्मोस कार्यक्रमासाठी प्रक्षेपण चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा होता. हे अत्यंत कुशल क्षेपणास्त्र अतिजलद वेगाने त्याच्या कमाल क्षमतेसह झेपावले आणि मोहिमेची सर्व उद्दिष्टे साध्य करण्यात आली. क्षेपणास्त्र प्रगत स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज होते आणि वाढीव कार्यक्षमता आणि कामगिरीसाठी सुधारित योग्य मार्गाचा अवलंब करण्यात आला.

सुधारित नियंत्रण प्रणालीसह क्षेपणास्त्रात अतिरिक्त क्षमता प्राप्त करण्यासाठी अनुरूप बदल करण्यात आले आहेत. या चाचणीवर पूर्व किनारपट्टी आणि जहाजांवर तैनात टेलीमेट्री, रडार आणि इलेक्‍ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली सह रेंज इन्स्ट्रुमेंटेशनच्या सर्व सेन्सर्सद्वारे देखरेख ठेवण्यात आली.
या चाचणीत डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएमच्या पथकांनी भाग घेतला.

ब्रह्मोस एरोस्पेस हा डीआरडीओ आणि एनपीओएम, रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रम असून, समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्यांविरोधात परिणामकारकता आणि गंभीर हानी पोहचवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये सतत सुधारणा केली जात आहे. ब्रह्मोस ही शक्तिशाली क्षेपणास्त्र शस्त्र प्रणाली असून यापूर्वीच सशस्त्र दलांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.