#INDvENG : इंग्लंडचे पुन्हा एकदा लोटांगण

अहमदाबाद – भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा सपशेल लोटांगण घातले. गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून 11 गडी बाद झाले. इंग्लंडचा पहिला डाव भारतीय गोलंदाजीसमोर 205 धावांवर संपला. त्यानंतर दिवसातील उर्वरित खेळात भारताने आपल्या पहिल्या डावात 1 बाद 24 धावा केल्या असून ते अद्याप 181 धावांनी पिछाडीवर आहेत.

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व आपल्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेतली. या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतल्याने त्याच्या जागी नवोदित वेगवान गोलंदाज महंमद सिराजचा समावेश करण्यात आला होता. त्यानेही ही निवड सार्थ ठरवताना इंग्लंडला आपल्या स्विंगने त्रस्त केले.

मात्र, पहिला बळी अक्‍सर पटेलनेच मिळवून दिला. त्याने सलामीवीर डॉमनिक सिबलीला तंबूत धाडले व तेथूनच त्यांच्या डावाला गळती लागली. पटेलनेच दुसरा सलामीवीर जॅक क्राऊलीचा अडसर दूर केला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने सिराजने इंग्लंडचा कर्णधार व धोकादायक फलंदाज ज्यो रूटला बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली. या सामन्यातही अक्‍सरच्या गोलंदाजीचे भूत इंग्लंडच्या मानगुटीवरून उतरू शकले नाही. त्यावेळी इंग्लंडची गत 3 बाद 30 अशी झाली होती. त्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्‍स व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी केली.

ही जोडी सिराजने फोडली. त्याने बेअरस्टोला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर स्टोक्‍सने ऑलिव्हर पोपला साथीला घेत 43 धावा जोडल्या. दरम्यान, स्टोक्‍सने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो फारकाळ टिकू शकला नाही. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. यावेळी इंग्लंडच्या 5 बाद 121 धावा झाल्या होत्या. त्यानंतरही त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

पंतने क्राऊलीला डिवचले

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॅक क्राऊलीचा बळी जरी अक्‍सर पटेलने घेतला असला तरीही त्यात मोठा वाटा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा होता. क्राऊली फलंदाजी करत असताना पटेलच्या षटकात पंतने त्याला डिवचले. इंग्लंडच्या संघातील एक फलंदाज जरा जास्तच चिडला आहे, असे पंत क्राऊलीला ऐकू जावे म्हणून मोठ्याने म्हणाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अनावश्‍यक फटका मारण्याच्या प्रयत्नात क्राऊली बाद झाला.

डॅनियल लॉरेन्स वगळता अन्य कोणालाही भारतीय फिरकीचा सामना करता आला नाही. लॉरेन्सनेही अनावश्‍यकपणे पुढे सरसावून फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्याने 46 धावा केल्या. त्यानंतर तळात जेम्स ऍण्डरसनने थोडीफार चमक दाखवली व संघाला द्विशतकी धावांची मजल मारून दिली. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावा संपुष्टात आला. भारताकडून अक्‍सर पटेलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. रवीचंद्रन अश्‍विनने 3, महंमद सिराजने 2 तर, वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.

त्यानंतर भारताच्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. संघाच्या धावांचे खातेही उघडलेले नसताना सलामीवीर शुभमन गिल ऍण्डरसनच्या गोलंदाजीवर पायचित बाद झाला. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा व चेतेश्‍वर पुजाराने संयमी फलंदाजी केली व इंग्लंडला आणखी यश मिळू दिले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 1 बाद 24 धावा झाल्या असून ते अद्याप 181 धावांनी पिछाडीवर आहेत. पुजारा 15 तर, रोहित 10 धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड पहिला डाव – 75.5 षटकांत सर्वबाद 205 धावा. (बेन स्टोक्‍स 55, डॉनियल लॉरेन्स 46, ऑलिव्हर पोप 29, जॉनी बेअरस्टो 28, अक्‍सर पटेल 4-68, महंमद सिराज 2-45, रवीचंद्रन अश्‍विन 2-47, वॉशिंग्टन सुंदर 1-14). भारत पहिला डाव – 12 षटकांत 1 बाद 24 धावा (चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 15, रोहित शर्मा खेळत आहे 8. जेम्स ऍण्डरसन 1-0)

Leave a Comment