जागतिक युवा स्पर्धेत भारताला सुवर्ण ; तिरंदाजीत दहा पदके केले निश्‍चित

व्रोकला,पोलंड – जागतिक युवा अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले असून शनिवारी भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी 18 वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाने अंतिम फेरी जिंकत सुवर्ण कामगिरी केली आहे.

त्यांनी अंतिम लढतीत 228-216 ने तुर्कीला पराभूत केले. तसेच अन्य तिरंदाजांनी आगेकूच करत दहा पदके निश्‍चित केली आहे.

भारताच्या 18 वर्षांखालील मुलींच्या संघाने पात्रता फेरीत विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. परनीत कौर, प्रिया गुर्जर व रिधु सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत 2160 पैकी 2067 गुणांची कमाई करत विश्वविक्रम नोंदवला होता.

आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघाने 22 गुण अधिक कमावले होते. बिशल चांगमाई, अमित कुमार आणि विक्की रुहल या अव्वल मानांकित रिकर्व्ह कॅडेट पुरुष संघाने उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी स्पॅनिश संघाचा 5-1 असा पराभव अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आता सुवर्णपदकासाठी त्यांचा सामना फ्रान्सशी होणार आहे.पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोम्मादेवरा या कनिष्ठ पुरुष त्रिकुटाने तिसरे मानांकन मिळाले होते. त्यांनी 0-2 अशी पिछाडी असताना अमेरिकन संघावर 5-3 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रविवारी त्यांचा सामना स्पेनशी होणार आहे.
पार्थ साळुंखे आणि कोमलिका बारी या कनिष्ठ मिश्र जोडीने सहाव्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या ऍलिना इडेनसेन आणि जोनाथन व्हेटरला 6-2 असे पराभूत करत आणखी एक पदक पक्के केले. या जोडीचा सामना रविवारी अव्वल मानांकित स्पेनशी होईल.
कुशल दलाल, साहिल चौधरी आणि नितीन अपार यांच्या कॅडेट कंपाऊंड पुरुष संघाने उपांत्य फेरीत तुर्कीला 232-230 ने पराभूत करून भारतासाठी एक पदक निश्‍चित केले. अंतिम फेरीत त्यांचा सामना अमेरिकेशी होणार आहे.