विशेष : व्यवहारज्ञानी

प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या पाठोपाठ उद्योजक गौतम अदानी या भारतीय व्यक्‍तीने तिसरे स्थान पटकावले आहे.

मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीजवितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे झाल्यानंतर, आता (Gautam Adani) अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई लिमिटेड शहराच्या उपनगरांच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार करणार आहे. मुंबई उपनगरातील वीजवितरण आणि त्याच्याशी संलग्न असे डहाणूचे वीज केंद्र, हा सारा व्यवसाय 2018 मध्ये अदानींनी अनिल अंबानींकडून ताब्यात घेतला. मुंबई उनगरातील वीज ग्राहकांसाठी कंपनीने चार नवीन डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. ग्राहकांना रोख आणि धनादेशाद्वारे देयक भरणा करण्याचा पर्याय, तक्रारी नोंदवणे आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे संपर्क साधणे, यासारख्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अदानी समूहातील तीन कंपन्यांनी एनडीटीव्ही या चॅनेलमधील 29 टक्‍के भागभांडवल अप्रत्यक्षपणे खरेदी केले असून, आता आणखी 26 टक्‍के हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे खुला प्रस्ताव ठेवला आहे.

एनडीटीव्हीचे हिंदी, इंग्रजी आणि एक बिझिनेस चॅनेल आहे. यूट्यूबवर एनडीटीव्हीचे कोट्यवधी सबस्क्राइबर्स आहेत आणि एनडीटीव्हीचे नक्‍त मूल्य 2400 कोटी रुपयांचे आहे. मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी राघव बहल यांच्याकडून “न्यूज एटीन नेटवर्क’ हा चॅनेलसमूह ताब्यात घेऊन माध्यमांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यात जिओमुळे दूरसंचार तसेच रिटेल क्षेत्र अंबानींच्या वर्चस्वाखाली आले. एनडीटीव्ही या माध्यम समूहाची कमालीची विश्‍वासार्हता असून, अदानी यांना आपल्या प्रतिमासंवर्धनाच्या दृष्टीने याचा चांगलाच उपयोग होणार आहे. मात्र आता अब्जाधीश गौतम अदानी यांनी हॅंडबॅग्ज, शूज वगैरेसाठी प्रसिद्ध असलेल्या “लुइ व्हिटन’चे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या तिघांत आपले स्थान निश्‍चित केले आहे. हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत. चीनचे जॅक मा आणि भारताचे मुकेश अंबानी यांनाही हे शक्‍य झालेले नाही. म्हणूनच अदानी यांचे हे यश उल्लेखनीय मानावे लागेल. अर्थात गेल्या आठ वर्षांतच अदानी यांचा वारू चौखूर उधळत आहे, हे नाकारण्याचे कारण नाही. प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (251 अब्ज डॉलर्स) आणि ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (153 अब्ज डॉलर्स) यांच्या पाठोपाठ 137 अब्ज डॉलर्ससह अदानी यांनी या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

गेल्या जुलैत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌सना पिछाडीवर टाकून, अदानी जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्‍ती बनले होते. मात्र गेट्‌स यांनी सामाजिक कार्यासाठी अधिक संपत्ती खर्च केल्यामुळेही त्यांची संपत्ती घसरली, हे महत्त्वाचे. केवळ 2022च्या पहिल्या आठ महिन्यांतच अदानींची संपत्ती 60 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. याच वर्षातील फेब्रुवारीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती म्हणून सिद्ध होत, त्यांनी अंबानींना मागे टाकले होते. या मे महिन्यात अदानींनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक होण्यासाठी “होल्सिम एजी’चा भारतातील सिमेंटचा धंदा दहा अब्ज डॉलर्सला कब्जात घेतला. त्यानंतर डीबी पॉवरचा औष्णिक वीज प्रकल्प सात हजार कोटी रुपयांत आपल्या पंखाखाली घेतला. इस्रायलचे भूमध्य सागरी किनाऱ्यावरील प्रमुख व्यापार केंद्र म्हणजे हायफा बंदर. इतर काही कंपन्यांसह अदानी पोर्टसने ते 1.18 अब्ज डॉलर्समध्ये घेतले. तसेच आंध्र आणि गुजरातमधील रस्ते मालमत्ता, मॅकवेरी एशिया इन्फ्रास्ट्रक्‍चर फंडकडून तीन हजार कोटी रुपयांना खरेदी केली. थोडक्‍यात, घरातल्या वाणसामानापासून ते कोळशाच्या खाणींपर्यंत आणि वीज केंद्रे, बंदरे, विमानतळ, रस्ते, रेल्वे या पायाभूत सुविधा क्षेत्रात अदानी यांनी आपले पंख पसरले आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात टाटा, बिर्ला, दालमिया, आर. पी. गोयंका अशा उद्योगपतींचा दबदबा होता. डावे नेते तर कामगारक्रांतीचा जयघोष करताना टाटा-बिर्ला प्रभृती भांडवलदारांचा नेहमीच निषेध करत असत. परंतु 1990 नंतर रिलायन्सचा पसारा वाढू लागला आणि गेल्या काही वर्षांत अदानींनी एकेक क्षेत्र पादाक्रांत करायला सुरुवात केली. टाटा-बिर्लाची जागा आता अदानी-अंबानी यांनी घेतली आहे. राजकारणात “हम दो, हमारे दो’ अशा प्रकारची टिप्पणीही करण्यात येत होती. शेतकरी आंदोलनानंतर रिटेल उद्योग, तसेच अन्नधान्याच्या गोदाम व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या अदानी व अंबानी यांना फटका बसेल, असे वाटत होते. परंतु तसे काहीही घडले नाही.
1978 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर गौतम अदानी मुंबईतील हिरे बाजारात व्यवसाय करू लागले. 1981 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अहमदाबादला येण्याचे आमंत्रण दिले. सामानाच्या वेष्टनासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिकची एक कंपनी गौतम यांच्या बंधूंनी विकत घेतली होती. परंतु कच्चा माल मिळत नसल्यामुळे ती अडचणीत होती. तेव्हा व्यवसायात हुशार असलेल्या गौतम यांनी, कांडला बंदरावर प्लॅस्टिक ग्रॅन्युअल्स आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. 1988 साली धातू, शेतीमाल आणि कापडाचा व्यापार करण्यासाठी अदानी एंटरप्राइझ लिमिटेडची स्थापना झाली आणि सहा वर्षांत तिची शेअर बाजारात नोंदणीही झाली. 1995 मध्ये आठ हजार हेक्‍टरांत पसरलेल्या मुंद्रा बंदराचे कामकाज बघण्यास सुरुवात केली.

देशातील एकचतुर्थांश मालाची आयात मुंद्रा बंदरात होते. जगातील सर्वाधिक कोळसा उतरवण्याची या बंदराची क्षमता आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोनखाली हे बंदर मोडत असल्यामुळे कोणताही कर द्यावा लागत नाही. तेवीस वर्षांपूर्वी अदानींनी विल्मर (फॉर्च्युन खाद्यतेल बनवणारी कंपनी) समूहासोबत खाद्यतेल उद्योगात प्रवेश केला. कणिक, तांदूळ, डाळी, साखर अशा अनेक दैनंदिन वापरातील जिनसांची निर्मिती अदानी-विल्मर करतात. सतरा वर्षांपासून अदानी समूहाने भारतीय अन्न महामंडळासोबत मिळून विविध राज्यांत महाकाय धान्य गोदामे उभारण्यास सुरुवात केली. अदानींनी ऑस्ट्रेलियातल्या लिंक एनर्जीकडून बारा हजार कोटींना कोळशाची खाणही बारा वर्षांपूर्वीच विकत घेतली. विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे समूह हे व्यवस्थापन गुरूंच्या दृष्टीने टीकाविषय ठरतात. परंतु वेगवेगळ्या क्षेत्रांत सक्रिय राहून अंबानी आणि अदानी हे यशस्वी ठरले आहेत.