Indian family : अमेरिकेत भारतीय कुटुंब आढळले मृतावस्थेत

न्यूयॉर्क – भारतीय दाम्पत्य आणि त्यांची ४ वर्षांची जुळी मुले मृतावस्थेत आढळल्याची घटना अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. ही घटना आत्महत्या आणि हत्येशी संबंधित असल्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

या कुटुंबातील पुरुषाचे नाव आनंद सुजित हेन्री असे होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव एलिस प्रियांका असे होते, असे त्यांच्या स्नेह्यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र या कुटुबाची ओळख उघड केलेली नाही. ही घटना सोमवारी सॅन माटेओ येथे घडली, असे पोलिसांच्या हवाल्याने माध्यमांनी म्हटले आहे.

घरातून कोणाचाही आवाज ऐकू येत नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घराचे दरवाजे तपासले असता कोणीही घरामध्ये बळजबरीने घुसल्याचे आढळले नाही. घरामध्ये चौघेही जण मृतावस्थेमध्ये आढळले. मुलांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या नाहीत.

पण दुर्दैवाने ते मृतावस्थेत आढळले. मुलांचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन केल्यानंतर समजू शकणार आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की त्यांच्या शरीरावर आघाताची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे मुलांचा गळा दाबला गेला होता.

किंवा त्यांना प्राणघातक डोस देण्यात आला होता. तर पती आणि पत्नी दोघांनाही बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या. न्यायालयाच्या नोंदीनुसार, पतीने डिसेंबर २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु त्याचा पाठपुरावा केला गेला नव्हता.