अंदमान निकोबार बेटानजीक भारतीय नौदलाच्या कवायती

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नसल्याचे दिसत आहे. लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीनने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. अशातच अंदमान निकोबार बेटानजीक नौदलाने केलेल्या कवायतींमधून चीनला एक कठोर संदेश देण्याचे काम केले आहे. तसेच याद्वारे भारत चीनच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अंदमान निकोबार बेटांजवळील भारतीय नौदलाच्या या कवायती महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. चीनचे काही समुद्री मार्ग याच भागातून जातात. तसेच या मार्गावरूनही चीनचा व्यापार होतो. चीनसाठी या कवायती दुहेरी हल्ल्याप्रमाणे आहेत. यापूर्वी दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची दोन लढाऊ जहाजांनीदेखील कवायती केल्या होत्या. परंतु त्यावेळी चीनकडे केवळ पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय युद्धनौका अंदमान निकोबार बेटांजवळ कवायती करत आहेत. यामध्ये युद्धनौका, लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. काही युद्धनौका ज्या मल्लकाकडे तैनात केल्या आहेत त्यादेखील या कवायतींमध्ये सामिल झाल्या आहेत, अशी माहिती या ड्रीलचे नेतृत्व करणारे इस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ रेअर अॅडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पाणबुड्यांचा शोध घेणारे विमान Poseidon-8I, ज्यामध्ये हारपून ब्लाॉक मिसाईल आहे, MK-54 लाईटवेट टोरपॅडो हेदेखील या ड्रीलचा प्रमुख भाग आहे. गेल्या महिन्यात मलक्कामध्ये भारत आणि जापाननंही एकत्रित कवायती केल्या होत्या. परंतु त्या मर्यादित स्वरूपाच्या होत्या.

Leave a Comment