T20 World Cup 2022 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पुढील महिन्यात निवड; वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित…

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या कालावधित होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पुढील महिन्यात 15 सप्टेंबररोजी होणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंसमोर नवोदित खेळाडूंना सरस कामगिरी करत संघात स्थान मिळवण्याचे आव्हान राहणार आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्‍टोबरपासून होणार आहे. प्रथम पात्रता फेरी आणि त्यानंतर 22 ऑक्‍टोबरपासून मुख्य स्पर्धेतील सामने होतील. गेल्या विश्वकरंडक स्पर्धेप्रमाणेच यंदाही भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे.

23 ऑक्‍टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघात सामना होईल.2007 साली भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मात्र, भारताला या स्पर्धेत यश मिळाले नाही. यंदा हा तब्बल 15 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

संघ जाहिर करण्याची मुदत 16 सप्टेंबर

या स्पर्धेसाठी सर्व संघांना आयसीसीने 16 सप्टेंबरची मुदत दिली आहे. आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड करता येणार आहे. तसेच करोनाच्या नियमांचा समावेश असल्याने प्रत्येक देशाच्या संघात जास्तीत जास्त 30 सदस्य (खेळाडू व सपोर्ट स्टाफ) ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, प्रत्येक सामन्यासाठी केवळ 23 जणांचेच पथक मैदानावर उपस्थित राहू शकते. त्यात 15 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील आठ जणांचा समावेश असणे आवश्‍यक आहे.