भारत-अमेरिका विमानसेवा पुन्हा होणार सुरु

नवी दिल्ली – भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानांची सेवा 21 जानेवारीपासून म्हणजेच शुक्रवारपासून पूर्ववत होईल, अशी घोषणा एअर इंडियाने केली आहे. बोईंग बी या विमानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने विमानसेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असून टेक ऑफ आणि लॅंडिंगमधील अडथळे दूर झाले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेत आणि भारतात दोन्हीकडे अडकून पडलेल्या प्रवाशांना आता लवकरच इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अमेरिकेत काही विमानतळांवर 5-जी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे अनेक विमानांना लॅंडिंग करताना अडथळे येत होते. त्यामुळे बुधवारपासून ही उड्डाणं रद्द करण्यात आली होती. ज्या विमानतळांवर 5-जी यंत्रणा आहे, त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ही विमानाच्या यंत्रणेतील फ्रिक्वेन्सीच्या जवळचीच असल्यामुळे खराब हवामानात विमान लॅंड करणं, हे पायलटसाठी आव्हानात्मक ठरत होते.

या पार्श्वभूमीवर सर्व कंपन्यांनी आपापल्या विमानातील यंत्रणा अद्ययावत करू घ्याव्यात, अशा सूचना अमेरिकेने केल्या होत्या. त्यानुसार आता आपल्या सर्व विमानांतील यंत्रणा अपडेटेड असून सध्या अमेरिकेतील फेऱ्या सुरू करण्यास काहीही हरकत नसल्याचे सांगण्यात आल्याची माहिती “एअर इंडिया’ने दिली आहे.