#INDvENG : अश्‍विनने कपिल व सोबर्स यांना टाकले मागे

चेन्नई – रवीचंद्रन अश्‍विनच्या शतकाने आधी धावांचा डोंगर उभारत अश्‍विनसह अक्‍सर पटेलने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडची अवस्था 3 बाद 53 केली व विजयाची चाहूल लागली.

आपल्या दुसऱ्या डावात भारताने 286 धावा केल्या व इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे कठीण आव्हान उभे केले. त्यानंतरइंग्लंडचे तीन गडी केवळ 53 धावांत तंबूत धाडत विजयाच्या उंबरठ्यावर पाऊल भक्कमपणे टाकले. आता इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजून 429 धावांची गरज असून भारताला या सामन्यातील विजयासह चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी सात बळींची गरज आहे.

दरम्यान, अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात अचाट कामगिरी करत माजी कसोटीपटू व महान गोलंदाज कपिल देव व वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर गॅरी सोबर्स यांच्या कामगिरीला मागे टाकले. एकाच कसोटी सामन्यात पाच बळी व शतक फटकावण्याचा पराक्रम तीनवेळा करत अश्‍विनने ही कामगिरी केली.

भारताकडून कपिल देव व रवींद्र जडेजा यांनी अशी कामगिरी केली आहे. पण अश्‍विनने ही कामगिरी तिसऱ्यांदा केली. त्यामुळे एकाच सामन्यात पाच बळी व शतक तीनवेळा फटकावणारा अश्विन हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

Leave a Comment