सोयाबीनचे निकृष्ट बियाणे; ‘कृषीधन’वर गुन्हा दाखल

जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून तक्रार

पुणे – पेरणीनंतर सोयाबीनचे पीक न हाती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याप्रकरणी जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिली. यावर कृषी विभागाने फिर्याद दिल्यानंतर सोयाबीनच्या बियाणे विक्री करणाऱ्या कृषीधन प्रा. लि. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्‍याचे कृषी अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (58 ) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृषीधनचे व्यवस्थापक दगडू अंभोरे (53) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्‍यातील 32 शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याबाबत तक्रार दिली होती. याप्रकरणी चौकशी करण्यात आल्यानंतर आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यातील कृषीधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रस्त्यावरील इमारतीत आहे. या कंपनीने खरीप हंगामासाठी जुन्नर तालुक्‍यातील सोयाबीनच्या “केएसएल’ वाणाची विक्री केली होती. शेतकऱ्यांनी वाण खरेदी करून पेरणी केली.

मात्र, सोयाबीनचे पीक हाती न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत जुन्नर तालुक्‍यातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती.

कंपनीकडून विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही 15 ते 30 टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment