केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या

डेहराडून – देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार घोडे-खेचर सवारी घेऊन येताच त्यांना लगोलग 18 किमीच्या त्याच मार्गावर रवाना केले जाते. भगवंताच्या नावावर त्यांना मिळणारी अमानुष वागणूक मन पिळवटून टाकणारी आहे.

स्थानिकांचा पैशांचा हव्यास मुक्‍या जनावरांच्या प्राणावर उठला आहे. गेल्या 62 दिवसांत सुमारे 90 घोडे-खेचरांचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती आहे. पायी मार्गावर भाविकांना पाठीवरून नेताना थकून पडलेल्या घोडे-खेचरांना बळजबरीने ओढणे, त्यांच्या नाकात बळजबरी सिगारेट भरण्यात येते. अशा आशयाची छायाचित्रे-व्हिडिओदेखील समोर आले आहेत.

समुद्रसपाटीपासून सुमारे 11 हजार फूट उंचीवर केदारनाथ धाम गाठण्यासाठी भाविकांना 18 किमींचा दुर्गम मार्ग पार करावा लागतो. ही पायी यात्रा गौरीकुंड येथून सुरू होते. हेलिकॉप्टर बुकिंग करू न शकलेले भाविक खेचरांद्वारे या मार्गावरून जातात.

घोडे-खेचरांचे मालक जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने त्यांना पुरेसा चारापाणी किंवा विश्रांतीदेखील देत नाहीत. क्षमतेपेक्षा जास्त कष्ट केल्यामुळे ते प्राण सोडू लागले आहेत. या जनावरांना एका दिवसात गौरीकुंड ते केदारनाथ हा मार्ग दोन-तीन वेळा तुडवावा लागत आहे.

कोट्यवधींची कमाई तरीही दुर्लक्ष
केदारनाथच्या पूर्वेकडील मार्गावर 5 हजार घोडे-खेचरांच्या वापराचीच परवानगी होती. परंतु यंदा प्रशासनाने यात्रेकरूंसाठी घोडे-खेचरांच्या संख्येत वाढ करून ती 6 हजार केली आहे. गेल्या वर्षी या खेचरांमुळे मालकांची कमाई विक्रमी 100 कोटींहून जास्त झाली होती.