वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा दिवेघाटात वावर; वन विभागाकडून परिसरात ड्रोनद्वारे शोधमोहीम

फुरसुंगी – अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट्याने दिवे घाटमार्गातच रस्ता अडवला. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. थोड्या विश्रांतीनंतर हा बिबट्या वाहनांच्या बाजुने फिरत-फिरत डोंगरात निघून गेला. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक दिवेघाटात दाखल झाले. त्यांनी बिबट्याची शोधमोहीम सुरू केली आहे.

याबाबत भाजप हवेली तालुकाध्यक्ष धनंजय कामठे म्हणाले, “रविवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान घाटमार्गातून प्रवास करणारे विजय भोसले यांना जखमी बिबट्या रस्त्यावर बसल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने संदीप परदेशी व आम्हाला ही माहिती दिली. आम्ही तातडीने वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, तोपर्यंत बिबट्या या घाटमार्गातून काही काळ तेथेच फिरत राहिला. काही काळानंतर तो खाली डोंगरात निघून गेला. बिबट्यामुळे घाटमार्गातील दोन्ही बाजूंची वाहने जागेवरच थांबली होती.

दुचाकीचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु, हा बिबट्या अत्यंत शांततेने निघून गेला. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला.’ वन परिमंडल अधिकारी मंगेश सपकाळे व वनरक्षक संजीव कांबळे यांनी रेस्क्‍यू टीम घेऊन घाटमार्गात शोधमोहीम सुरू केली. उंच डोंगराळ भाग असल्याने ड्रोनच्या मदतीने जखमी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता. वडकीचे उपसरपंच महेश जाधव म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून कानिफनाथ पायथा, दिवेघाट, मस्तानी तलाव या भागांत या अगोदरही अनेकदा बिबटे वावरताना दिसून आले.

या परिसरात बिबटे दिवसा व रात्री फिरत आहेत. जागोजागी शेतामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत. अन्नाच्या शोधात ते आधी कुत्र्यांवर हल्ला करतात. नंतर पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. शिकार मिळाली नाही, तर हे बिबटे नरभक्षक होऊन मानवांवर हल्ले करू लागतात. या भागात बिबट्याचा पुन्हा वावर सुरू झाल्याने भीतीचे वातावरण आहे.’

बिबट्याला झालेली जखम जास्त गंभीर नसावी. त्यामुळे त्याने दूर सुरक्षित ठिकाणी जाऊन विसावा घेतला असावा. शोध सुरूच असून, बिबट्या सापडताच त्याच्यावर उपचार करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. – मंगेश सपकाळे,
वन परिमंडल अधिकारी