“आमची तपासणी करण्यापेक्षा अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करा”; चीनचा डब्ल्यूएचओला इशारा

वुहान: संपूर्ण जगाला ज्या करोना विषाणूमुळे हैराण करून सोडले आहे त्याचे उगमस्थान चीनमध्ये असल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो. दरम्यान, याच आरोपांवर आता चीनने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चीनकडून स्पष्टीकरण देताना अमेरिकेवर याचे खापर फोडले आहे. चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आवाहन केले आहे.

चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान  यांनी याविषयी चीनची बाजू मांडली आहे. “जर प्रयोगशाळांची चौकशी करायची असेल तर डब्ल्यूएचओ तज्ञांनी फोर्ट डेट्रिकला जायला हवे.” “अमेरिकेने शक्य तितक्या लवकर पारदर्शक आणि जबाबदारीने काम केले पाहिजे आणि आरोग्य संघटनेच्या तज्ञांना फोर्ट डेट्रिक लॅबच्या चौकशीसाठी बोलवले पाहिजे. या मार्गानेच जगासमोर सत्य बाहेर येऊ शकते,” असे झाओ लिजियान म्हणाले.

झाओ लिजियान यांचे हे विधान प्रयोगशाळेतून करोना व्हायरसची गळती होऊन एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली आणि नंतर तो जगभर पसरला या सिद्धांताशी संबंधित होते. करोनाच्या पहिल्या घटना वुहानमध्ये नोंदल्या गेल्या असल्याने, चिनी शहरातील प्रयोगशाळेला मुख्य संशयित मानले जात आहे.

तर, चीनने याचा कडाडून विरोध केला आहे आणि अनेक वेळा असा आरोप केला आहे की, चीनच्या प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याचा सिद्धांत मांडणाऱ्यांनी अमेरिकेतला फोर्ट डेट्रिक जैविक प्रयोगशाळेची चौकशी केली पाहिजे. वुहानमधील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेची तपासणी करण्यासह चीनमध्ये कोविड-१९ च्या उत्पत्तीच्या पुढील टप्प्यासाठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावर चीनने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

एक इंग्रजी वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, अमेरिकन फोर्ट डेट्रिक बायोलॅबची तपासणी करण्यासाठी चिनी नेटिझन्सनी स्वाक्षर्‍यांची मोहिम सुरु केली होती. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या प्रयोगशाळेची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. या स्वाक्षर्‍याची संख्या १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. पण आतापर्यंत अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अमेरिकेतून या सिग्नेचरच्या सर्व्हरवर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

फोर्ट डेट्रिक येथील जैविक प्रयोगशाळेच्या संदर्भातील सर्व शंकांबाबत अमेरिकेने उत्तर दिले पाहिजे. १३ दशलक्षाहून अधिक चिनी नेटिझन्सनी न्यायाची मागणी केली असताना ते अजूनही शांत का आहे? आता दावा करणारी पारदर्शकता कुठे आहे?’’ असे एक इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार झाओ लिजियांग यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात विचारले होते.